जयपूर : राजस्थानच्या जयपूरमधील झोटवाडा परिसरात दिवसाढवळ्या एका ज्वेलरी शॉपमधून तब्बल २० लाख किमतीच्या २५ सोन्याच्या अंगठ्यांनी भरलेला बॉक्स चोरून तरुणी पसार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एखाद्या चित्रपटातील प्रसंगाप्रमाणे घडलेला हा संपूर्ण प्रकार दुकानातील कॅमेर्यात कैद झाला आहे.
झोटवाडा परिसरातील निवारू रोडवरील लक्ष्मी नगर येथील भवानी ज्वेलर्समध्ये ही घटना घडली. दुकानाचे मालक त्रिलोक चंद प्रजापत यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी ११:४५ च्या सुमारास एक तरुणी ग्राहक बनून दुकानात आली. तिने सोन्याच्या अंगठ्या दाखवण्याची विनंती केली. त्यानुसार दुकानदाराने २० लाख रुपये किमतीच्या २५ अंगठ्यांचा बॉक्स तिच्यासमोर ठेवला.
अंगठ्यांचा संपूर्ण बॉक्सच उचलला..
तरुणीने दोन अंगठ्या पसंत केल्याचं भासवलं आणि वडिलांकडून ऑनलाइन पेमेंट करून घेते असे सांगत वेळ काढूपणा करण्यास सुरुवात केली. दरम्यान, दुकानदार दुसर्या ग्राहकाकडे लक्ष देत असल्याचं पाहून तरुणीने अंगठ्यांचा संपूर्ण बॉक्स उचलला आणि दुकानाबाहेर रस्त्याच्या दिशेने धाव घेतली. तरुणी पळून जात असल्याचं पाहताच दुकानदार आणि त्यांच्या कर्मचार्यांनी तिच्या मागे धाव घेतली. ५०० मीटर पाठलाग केल्यानंतर स्थानिक लोकांच्या मदतीने तिला रंगेहात पकडण्यात आलं. सोन्याच्या अंगठ्यांचा बॉक्स सुरक्षितपणे मिळाला. यानंतर तरुणीला झोटवाडा पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आलं.
मिरची पावडर आणि केमिकल स्प्रे
रस्त्यावरून पळणारी तरुणी आणि तिच्या मागे धावणारे व्यापारी ही दृश्येही मध्ये कैद झाली आहेत. पकडल्यानंतर या तरुणीने मला जेलमध्ये जायचं आहे असं विचित्र विधान केलं. तिच्या पर्सची झडती घेतली असता त्यामध्ये मिरची पावडर आणि केमिकल स्प्रे आढळून आला आहे. याप्रकरणी पोलीस सध्या पुढील तपास करत आहेत.